Shankarrao Srikrushna Deo
Quick Facts
Biography
शंकरराव देव म्हणून प्रसिद्ध असलेले शंकर श्रीकृष्ण देव (जानेवारी २८, इ.स. १८९५ - डिसेंबर ३०,इ.स. १९७४), हे महाराष्ट्रातील एक काँग्रेस कार्यकर्ते,सर्वोदयी नेते आणि रामदासी संप्रदाय व सांप्रदायिक साहित्याचे अभ्यासक, संशोधक होते.
बालपण
शंकरराव देवांचे मूळ गाव सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातले बावधन आहे. तेथे त्यांचे आजोबा शेती करीत, तर वडील हे पुण्याला आचाऱ्याचा व्यवसाय करीत असत. आई गंगूबाई, शंकरराव अडीच वर्षांचे असताना वारल्या.
शिक्षण
त्यांचे प्राथमिक शिक्षण भोर येथील त्यांच्या आजीच्या काकूने केले.पुढील शिक्षण बावधन, पुणे, बडोदे आणि मुंबई येथे होऊन शंकरराव देव १९१८ साली बी.ए. झाले.
स्वातंत्र्य चळवळीत सहभाग
कॉलेजमध्ये असताना शंकरराव देवांचा न.वि. गाडगीळ, विनोबा भावे यांच्याशी संबंध आला. बिहारमध्ये महात्मा गांधी खंडाने घेऊन शेत कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चळवळ करीत होते (१९१७), तेथे जाऊन आले. गंगाधरराव देशपांडे यांनी शंकररावांचा परिचय महात्मा गांधींशी करून दिला, आणि शंकरराव असहकाराच्या चळवळीत सहभागी झाले.
सत्याग्रह आणि तुरुंगवास
सेनापती बापटांबरोबर शंकरराव देवांनी पुण्याजवळील मुळशी सत्याग्रहात भाग घेतला (१९२३). त्याकरिता त्यांना तुरुंगवास व फटक्यांची शिक्षा भोगावी लागली. त्यांनी आपल्या संघटनचातुर्याने व ओजस्वी वक्तृत्वाने सारा महाराष्ट्र जागृत केला. महाराष्ट्रात प्रांतिक काँग्रेस समिती सुरू केली. ब्रिटिशांच्या फोडा व झोडा या धोरणासंबंधी स्वराज्या’मधील त्यांनी लिहिलेल्या लेखांबाबत त्यांना पुन्हा दीड वर्षाची शिक्षा झाली. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहातही भाग घेतला (१९३०). त्याबद्दलही त्यांना दीड वर्षाची शिक्षा झाली. १९४१ सालातील वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना दीड वर्षाची शिक्षा झाली.
काँग्रेसपक्षामध्ये भूषविलेली पदे
- महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्षपद (१९३०).
- काँग्रेस कार्यकारिणीचे सभासदत्व (१९३६).
- महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे भरलेल्या ५०व्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद (१९३६).
- अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीसपद (१९४६–५०).
- घटनासमितीचे सदस्यत्व.
- हंगामी संसद सदस्यत्व.
- निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे ठरविणाऱ्या समितीचे सदस्यत्व.
- गांधी स्मारक निधीचे अध्यक्षपद
शेवटची निवडणूक आणि राजकारण निवृत्ती
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक ते १९५० मध्ये हरले व त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून जवळजवळ संन्यास घेतला. उरुळी कांचन येथे त्यांनी एक आश्रम बांधला आणि ते तेथे राहू लागले. शंकरराव देवांच्या प्रोत्साहनाने व त्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे समाज प्रबोधन संस्था स्थापन झाली. त्या संस्थेतर्फे समाज प्रबोधन पत्रिका नावाचे द्वैमासिक नियमित निघत असते.
निवृत्तीनंतर
पुढे ते आचार्य विनोबा भाव्यांच्या भूदान चळवळीत सहभागी झाले. त्यांनी तमिळनाडू व केरळ या राज्यांत पदयात्रा काढली. त्यांची वृत्ती आध्यात्मिक होती. ज्ञानेश्वरी, गीता, उपनिषदे यांचा सखोल व्यासंग त्यांनी केला होता. विनोबांच्या सर्व सेवासंघात असताना १९६२च्या चीनच्या भारतावरील आक्रमणानंतर शंकररावांनी काही सहकाऱ्यांसोबत पेकिंगची पदयात्रा काढली. पण पूर्व पाकिस्तान व ब्रह्मदेश या देशांनी त्यांना प्रवेश नाकारला. चीनला जाता न आल्याने निरुपायाने त्यांनी हिमालयाच्या पायथ्याशीच पायी दीर्घ प्रवास केला.या प्रवासामुळे त्यांची प्रकृती ढासळली, ती अखेरपर्यंत सुधारली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी अग्रभागी रहाण्याचा प्रयत्न केला, पण ते काँग्रेस श्रेष्ठींची संयुक्त महाराष्ट्र न देण्याची कारणे महाराष्ट्रातील जनतेला पटवून देऊ शकले नाहीत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीस हिंसक स्वरूप येईल असे वाटू लागल्यावर शंकरराव देवांनी उरुळी कांचन येथे ३० दिवसाचे उपोषण केले.
गांधीवादी शंकरराव देव
शंकरराव देव हे खरेखुरे गांधीवादी होते. त्यांनी आजन्म ब्रह्मचर्यव्रत पाळले आणि महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार केला. गांधीजी व काँग्रेस यांकरिता त्यांनी लक्षावधी रुपयांचा फंड गोळा केला. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात ते सासवड येथे त्यांनीच सुरू केलेल्या आश्रमात रहात होते.
शं.श्री. देवांचे कार्य
नानासाहेब देव यांनी समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव, जांब याचा पूर्ण विकास घडवून आणला आणि तेथे समर्थांची एक मूर्ती स्थापन करून एक उत्तम मंदिर उभारले. त्याचप्रमाणे धुळे येथे १९३५ मध्ये श्री समर्थ वाग्देवता मंदिर उभारले. हे तर समर्थ सांप्रदायिकांचे विद्यापीठच म्हणावे लागेल. तेथे समर्थांनी आणि त्यांच्या शिष्यांनी लिहिलेले अफाट साहित्य उत्तम प्रकारे जतन केले आहे. त्यात आपल्याला रामदासी गाथा, बखर, बाडे, विविध ग्रंथ, संदर्भ ग्रंथ इत्यादी अफाट साहित्य बघायला मिळते. हे सर्व प्रकाशनाचे काम देवांनी उत्तम प्रकारे केले. शंकरराव देव म्हणत असत "शिव-समर्थांचे स्मरण हे महाराष्ट्राचे जीवन तर त्यांचे विस्मरण हे महाराष्ट्राचे मरण".
- जांब येथे समर्थ मंदिराची स्थापना
- भारतभरातील विविध समर्थ-मठांत तसेच अन्य ठिकाणी फिरून समर्थ संप्रदायाच्या साहित्याचा संग्रह.
- समर्थ रामदास स्वामींनी जेथे दासबोध लिहिला, त्या शिवथरघळ या ठिकाणाचा शोध १९३०मध्येलावला.
- धुळे येथे समर्थ संप्रदायाचे साहित्याचा संग्रह जतन व प्रसार करणे यासाठी समर्थ वाग्देवता मंदिर व सत्कार्योत्तेजक सभा यांची स्थापना.
- धुळे येथे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या साहित्याचा संग्रह, जतन व प्रसार करणे यासाठी राजवाडे संशोधन मंदिराची स्थापना.
- ’रामदास व रामदासी’ या मासिकाद्वारे समर्थ साहित्याचे प्रकाशन.
ग्रंथलेखन
- पहिला सुमनहार
- शं.श्री. देवांनी लिहिलेले तीन खंडांचे श्री समर्थचरित्र (श्रीसमर्थावतार, श्रीसमर्थहृदय, श्रीसमर्थ संप्रदाय) प्रसिद्ध आहे.
- श्री दास विश्रामधाम. खंड १ ते ४
- श्री दिनकरांची स्फुट कविता
- श्रीमत् दासबोधाची किल्ली
- श्रीमत् दासबोधांतर्गत श्री समर्थ चरित्र
- श्री निवृत्तीराम
- श्री रामदास पंथ क्रमसार
- श्री रामदासांची कविता
- श्रीराम सोहळा
- श्री संप्रदायाची कागदपत्रे
- श्री समर्थकृत करुणाष्टके, धाटया, सवाया
- श्री समर्थ प्रताप
- श्री समर्थ मंदिर-जांब
- श्रीसमर्थशिष्य उद्धवस्वामी (चरित्र)
- श्री समर्थ्रशिष्य कल्याण (चरित्र)
- श्री समर्थांची दोन जुनी चरित्रे
- श्री समर्थांची लघुकाव्ये
- श्री समर्थांची शिकवण
- श्री सीता स्वयंवर
- श्री स्वानुभव दिनकर
- सुवर्ण महोत्सव ग्रंथ (२००४)
इतर लेखनकार्य
- त्यांनी सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला काढून तीतून उत्तम वैचारिक पुस्तके प्रसिद्ध केली. उपनिषत्सारव भगवान बुद्धही त्यांची पुस्तके विशेष गाजली.
- गांधीजींच्या अनेक पुस्तकांचे अनुवाद केले.
- वर्तमानपत्रांतून विपुल स्फुटलेखन.
- त्यांनी नवभारत (मासिक) हे वैचारिक मासिक त्यांनी सुरु केले.(१९४७). त्याचे ते १९५६पर्यंत संचालक होते.
- स्वराज्य नावाचे साप्ताहिक काढले (१९२५).
- लोकशक्तीनावाचे दैनिक सुरू केले (१९३८).
आत्मचरित्र
शंकरराव देवांनी 'दैव देते पण कर्म नेते' या नावाचे आत्मचरित्र लिहिले. ते त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले.
गौरव
समाज प्रबोधनाच्या कार्यकर्त्यांनी १९७३ मध्ये शंकररावांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त भारतीय प्रबोधन नावाचा अभिनंदनग्रंथ त्यांना अर्पण केला.