Panditrao Kulkarni
Quick Facts
Biography
पंडितराव दाजी कुलकर्णी( ४ जुलै १९२८ माणकापूर, कर्नाटक, मृत्यू: ६ जुलै २०२०, कोल्हापूर) हे महाराष्ट्रातील इचलकरंजी येथील एक उद्योजक होते. ते पंडितकाका कुलकर्णी या नावाने सर्व परिचित होते.
पार्श्वभूमी
पंडितरावांचे मूळ गाव इचलकरंजीजवळील माणकापूर होते. त्यांच्या कुटुंबातील सर्वांना अभियांत्रिकीची आवड होती. त्यांचे मोठे भाऊ शंकरराव दाजी कुलकर्णी हे यंत्रमहर्षी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी १९४९ मध्ये भारतातील पहिली कार मीरा तयार केली होती.
शिक्षण
पंडितरावांचे शालेय शिक्षण इचलकरंजी येथे झाले. पुढे त्यांनी विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथून बी.एस.सी.ची पदवी घेतली.
कारकीर्द
पंडितकाका कुलकर्णी यांनी अभियांत्रिकीचे औपचारिक शिक्षण घेतलेले नव्हते. सुरुवातीला शंकररावांच्या कुल्को इंजिनीअरींग वर्क्स या कंपनीसाठी पंडितरावांनी जॉब वर्क केले. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी १९५३ साली दसऱ्याच्या दिवशी फ्युएल इन्स्ट्रुमेंट्स अँड इंजिनीअर्स प्रायव्हेट लिमिटेड (एफ.आय.इ- फाय) ही कंपनी स्थापन केली. १९६१ मध्ये त्यांनी हार्डनेस टेस्टर हे कास्टिंगचे काठिण्य मोजणारे मशीन भारतात पहिल्यांदा तयार केले. १९७० मध्ये त्यांनी युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन भारतात पहिल्यांदा बनवले. १९७३ मध्ये त्यांच्या कंपनीने आपल्या उत्पादनांची परदेशात निर्यात करणे सुरू केले. १९७७ मध्ये बंगळूर येथे त्यांनी अशोक साठे यांच्याबरोबर प्रगती इंजिनीअरींग कंपनी सुरू केली.त्यांनी एफआयइ (FIE) या नावाने कंपन्यांच्या समूहाची स्थापना केली. या समूहाच्या सुमारे पंचवीस कंपन्या इचलकरंजी आणि परिसरामध्ये कार्यरत आहेत. या कंपन्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करतात. हार्डनेस टेस्टिंग मशीन, कार वॉशिंग मशीन इत्यादी या कंपन्यांची उत्पादने आहेत. जपानमधील केईहीन कंपनीच्या सहयोगाने त्यांनी केईहीन-फाय या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी दुचाकी आणि तिचाकी वाहनांसाठी हाय प्रिसिजन कार्बुरेटर आणि एर सक्शन व्होल्व्हज बनवते. या कंपनीचे महाराष्ट्रातील चाकण, गुरुग्रामजवळील बावल आणि कर्नाटकातील दोड्डाबल्लारपूर येथे कारखाने आहेत.
विविध देशातील उद्योगांना भेट देऊन तेथील तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती समजून घेण्यात पंडितरावांना रस होता. त्यांनी पोलंड, हंगेरी, रशिया, जपान,इंग्लंड,फ्रान्स, जर्मनी अशा अनेक देशांना भेटी दिल्या.
कमी उत्पादन खर्चात चांगल्या गुणवत्तेची उत्पादने तयार करण्यावर त्यांनी नेहमी भर दिला.
पंडितरावांनी इचलकरंजीचे नगराध्यक्षपदसुद्धा भूषवले होते.
पुरस्कार
१९७० मध्ये त्यांनी औद्योगिक तसेच सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यास सुरुवात केली. त्यासाठी फाय फाऊंडेशनची स्थापना केली. अभियांत्रिकी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कला, क्रीडा, स्थानिक प्रतिभा असा अनेक क्षेत्रात हे पुरस्कार दिले जातात. पाच लाख रुपयांचा सर्वोच्च पुरस्कार 'राष्ट्रभूषण' या नावाने दिला जातो. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींमध्ये सुमंत मुळगावकर, जयंत नारळीकर, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ.राजा रामण्णा, रूसी मोदी,लता मंगेशकर, रतन टाटा, जयप्रकाश नारायण, नानासाहेब गोरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ.रा.ना.दांडेकर,नारायण मूर्ती यांचा समावेश आहे.
याशिवाय बंगळूर येथे दर दोन वर्षांनी होणाऱ्या इम्टेक्स या अभियांत्रिकीच्या मोठ्या प्रदर्शनात नवीन तंत्रज्ञान, यंत्र आणि संकल्पनांना फाय फाऊंडेशन पुरस्कार दिले जातात.